अमित, गौरव उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा अनुभवी खेळाडू विकास कृष्णनला दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला असला तरी अमित फंगल आणि गौरव बिंधुरी यांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात स्थान पटकावले आहे.

अमितने ४९ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित इक्वोडोरच्या कालरेस क्युपोवर दमदार विजय मिळवला, तर गौरवने ५६ किलो वजनी गटामध्ये युक्रेनच्या मिकोला बुस्टेंकोला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. २०११ साली या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या विकासने या वेळी मात्र निराशाच केली. ७५ किलो वजनी गटामध्ये विकासला इंग्लंडच्या बेंजामिन विटकरने पराभूत केले. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या सुमित सांगवानला (९१ किलो) ऑस्ट्रेलियाच्या जेसन वॉटेलीने यापूर्वीच पराभूत केले.

या वर्षी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या अमितचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना चांगलाच रंगला. अटीतटीच्या या सामन्यात अमितने जिद्दीने खेळ करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत अमितला दुसऱ्या मानांकित उझबेक दुसमातोव्हशी दोन हात करावे लागणार आहेत, तर गौरवचा सामना बिंलेल म्हामदीशी होणार आहे.

अमितविरुद्ध रिंगमध्ये उतरलेल्या कालरेसकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा चांगला अनुभव होता. त्यामुळे अमितला ही लढत सोपी जाणारी नव्हती. पण अमितने कालरेसचा या वेळी आत्मविश्वासाने सामना केला. त्याचा खेळ एवढा बहरत होता की, कालरेस हा सातवा मानांकित खेळाडू आहे, असे वाटत नव्हते. पण विकास आणि सुमित यांच्या पराभवाने भारताला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. पण अमित आणि गौरव त्यांची उणीव भरून काढतील, असा विश्वास भारतीय खेळाडूंना आहे.

‘अमित आणि गौरव यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत दिमाखदार खेळ केला, पण यापुढे त्यांनी कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. यापुढे त्यांना प्रतिस्पध्र्याला एकही संधी देता कामा नये. कारण यापुढची स्पर्धा कठीण होत जाणार आहे. त्यानुसार आम्हाला रणनीती आखून तिची अंमलबजावणी कशी करता येईल हे पाहावे लागेल,’ असे भारताचे प्रशिक्षक सँटीआगो निएव्हा यांनी सांगितले.

तापामुळे शिवा थापाची माघार

गतवेळी कांस्यपदक पटकावणारा भारताच्या शिवा थापाला पोटाच्या दुखण्यामुळे व तापामुळे १९व्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तो पहिल्या फेरीत जॉर्जियाच्या ओतार एरानोस्यान याच्या आव्हानास सामोरे जाणार होता. भारतीय संघाच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘रविवारी रात्रीपासून तो आजारी पडला. त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला या स्पर्धेत न खेळण्याचा सल्ला दिला. त्याला लगेच औषधपाणी करण्यात आले. तथापि, तो खूपच अशक्त झाला असल्यामुळे लढतीत खेळणे त्याच्यासाठी अशक्य होते.’ शिवाने तीन वेळा आशियाई विजेतेपद मिळविले असून, दोन वेळा त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.