विश्वचषक स्पर्धेमधील भारताचा दुसरा सामना रविवारी ओव्हल मैदानात पार पडला. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय पाठीराखे मोठ्या संख्येने हजर होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच ओव्हलचे रेल्वे स्थानक चाहत्यांनी भरून गेले होते. त्यातही भारतीय झेंडे आणि निळ्या रंगाच्या जर्सीमधील चाहत्यांची संख्या अधिक होती. याच गर्दीमधील ओव्हल मैदानाबाहेरील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक इंग्रज आजोबा चक्क भेळ-पुरी विकताना दिसत आहेत. हे आजोबा अगदी एखाद्या अस्सल भारतीय भेळ-पुरीवाल्याप्रमाणे भेळ-पुरी बनवताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही रिट्वीट केला आहे.

एका भारतीय चाहत्याने या भेळ-पुरी विकणाऱ्या इंग्रज आजोबांच्या स्टॉलचा व्हिडिओ शूट करुन तो ट्विटवर पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांना टॅग करुन सर काल ओव्हल मैदानाबाहेरचा हा व्हिडिओ नक्की पाहा असं या ट्विटर युझरने म्हटले आहे. अमिताभ यांनाही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. ‘व्हेरी वेल डन’ या इंग्रजी शब्दात बदल करुन त्यांनी ‘भेरी भेल डन’ म्हणत हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

या व्हिडिओमधील आजोबांनी आपण अशी भारतीय स्टाइलची भेळ-पुरी बनवण्यासाठी कोलकात्यामध्ये शिकल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये या आजोबांच्या भेळ-पुरीच्या पाटीमधील सर्व गोष्टी दिसतात. यामध्ये कापलेले कांदे, चुरमुरे, चिंचेची चटणी, तिखट चटणी, शेंगदाणे, शेव असे बरेच पदार्थ यामध्ये दिसतात. या व्हिडिओत हे भेळ-पुरी विकणारे आजोबा मॅगझिनची पानं फाडून त्यापासून भेळ-पुरीचे पुडे बांधताना दिसत आहेत. आपल्याला येथे अनेक भारतीय ओळखतात असंही या आजोबांनी सांगितले आहे.

ट्विटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला अवघ्या चार तासांमध्ये एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यामध्ये मैदानातील २० हजारांपैकी १९ हजार ५०० पाठीराखे हे भारताच्या बाजूने होते असं म्हटलं जातं आहे.