महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.

त्यानंतर करोना आजारातून लवकर सावरावेत आणि तंदुरूस्त व्हावेत यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचे ट्विट पडण्यास सुरूवात झाली. त्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही अमिताभ यांच्यासाठी संदेश दिला. “अमित जी काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच तुम्ही लवकर बरे व्हावे, हीच सदिच्छा!”, असे सचिनने ट्विटमध्ये लिहिले.

अमिताभ बच्चन यांनी स्वत: दिली माहिती

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

करोनाची लागण आता महानायक अमिताभ बच्चन यांनाही झाली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचवेळी त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र सुरुवातीला बच्चन कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करुन ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे.