सत्तरीच्या दशकात अमिताभ बच्चनने ‘जंजीर’ आणि ‘दीवार’ चित्रपटांमुळे तिकीट खिडकीवर चाहत्यांना आकर्षित केले.. किशोरकुमारने आपल्या जादूई आवाजाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घातली.. तर सुनील गावस्करने क्रिकेटची मशाल पेटवत युवा राष्ट्राचे भवितव्य आपल्या हाती घेतले. ‘उत्तम लढत कशी द्यावी’ हा धडा त्याने दिला.

६ मार्च १९७१.. या दिवशी गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या घटनेला शनिवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘सन्नी’ आणि ‘लिटिल मास्टर’ या टोपणनावाने भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला गावस्कर हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला. गेली पाच दशके गावस्कर यांची जादू टिकून आहे. आता समालोचन कक्षातून ते सामन्यांचे यथोचित वर्णन करतात आणि मैदानावरील घडामोडींबाबत सडेतोड भाष्य करतात.

‘‘अमिताभ आणि किशोरकुमार यांच्या पंक्तीत तुम्ही माझी गणना करू नका. ते माझ्यापेक्षा मोठेच आहेत,’’ असे गावस्कर यांनी सांगितले. विंडीजविरुद्धच्या पदार्पणीय मालिकेत गावस्कर यांनी एकूण ७७४ धावा काढून छाप पाडली. याविषयी गावस्कर म्हणाले, ‘‘त्या मालिकेत माझ्याकडून ३५०-४०० धावा झाल्या असत्या, तरी मला समाधान वाटले असते,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.