येत्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनने संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिग्गज माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदारची निवड केली आहे. सीआयसीच्या जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी या तीन सदस्यांनी ही निवड केली.

मुझुमदारव्यतिरिक्त माजी भारतीय फिरकीपटू साईराज बहुतुले आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईचा पुढील प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गेल्या आठवड्यात मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. ज्यांनी ५० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तेच या पदासाठी अर्ज करू शकत होते. भारताचा दिग्गज माजी कसोटीपटू वसीम जाफरही मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होता, मात्र मुझुमदारने त्यालाही मागे टाकले.

हेही वाचा – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या बहिणीशी केला साखरपुडा

अमोल मुझुमदारच्या नेतृत्वात मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. निवृत्तीनंतर तो एनसीए, आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स, दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे. याशिवाय तो समालोचन क्षेत्रातही होता. १९९३ ते २०१३ या स्थानिक क्रिकेट हंगामात अमोल मुझुमदारने जबरदस्त कामगिरीचे दर्शन घडवले होते. १७१ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ११,१६७ धावा कुटल्या होत्या.