क्रिकेटची अविरत सेवा करणारा आणि स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचे डोंगर उभारूनही भारतीय संघाचा टिळा न लागल्यामुळे ‘शापित गंधर्व’ ठरलेल्या अमोल मुझुमदारने गुरुवारी प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार नसला तरी नेदरलँड्समध्ये क्रिकेट खेळण्याचा अमोलचा मानस आहे.
मुंबईच्या खडूसपणामध्ये मुरलेल्या अमोलने पदार्पणातच २६० धावांची खेळी साकारत विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर अमोलने धावांची टांकसाळच उघडली होती, पण भारतीय संघाचे दार त्याच्यासाठी कधीच उघडले गेले नाही. तसेच आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या वेळी अमोल मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार असतानाही एकाही संघात त्याला स्थान मिळाले नव्हते.
‘‘निवृत्तीचा निर्णय घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे. कारण मैदानामध्ये मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून न खेळल्याची मला खंत वाटते आहे. मुंबईच्या संघाला नेहमीच माझ्या हृदयात जागा असेल. माझ्याकडे कोणत्याच गुणवत्तेची कमतरता नव्हती आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे निवृत्तीच्या वेळी सांगताना अमोलला गहिवरून आले होते.
अमोलने स्थानिक क्रिकेटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ४८.१३च्या सरासरीने ११,१६७ धावा केल्या, ज्यामध्ये ३० शतकांचा समावेश आहे. रणजी क्रिकेटमध्ये अमोल १६ वर्षे मुंबईकडून खेळला. अमोलच्या नेतृत्वाखाली मुंबईने २००६-०७मध्ये रणजी करंडक पटकावला होता.
अमोल म्हणाला की, ‘‘१९९६-९७च्या मोसमात मी रणजी उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक झळकावले होते, त्यानंतर इराणी चषकाच्या सामन्यातही मी शतक लगावले. त्या वेळी भारतीय संघात मला स्थान मिळेल, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. आता नेदरलँड्समध्ये प्रशिक्षण देत असून, कदाचित तिथून खेळण्याचीही संधी मिळेल.’’

अमोलच्या फलंदाजीने संस्मरणीय छाप पाडली आहे. त्याला शुभेच्छा आणि निवृत्त मंडळींमध्ये त्याचे स्वागत!      
-सचिन तेंडुलकर

अमोल मुंबई क्रिकेटचा उपेक्षित नायक आहे. अद्भुत प्रदर्शनाचा वारसा त्याने जपला आहे. प्रत्येक सामन्यात सर्वस्व झोकून देणारा खेळाडू आहे.   
-रोहित शर्मा