देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतीय संघातले खेळाडू या काळात घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. काही खेळाडू घरातल्या घरात व्यायाम व सराव करण्यावर भर देत आहेत. आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द केल्यास बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं, यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवता येईल का यावर विचार करत आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयारी दाखवली आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या मतेही आयपीएल देशातला माहोल बदलू शकतं, तो इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“गेली ७-८ वर्ष या काळात मी आयपीएल खेळतो आहे. मात्र आता परिस्थिती जरा वेगळीच आहे. काहीही न करता घरी बसून रहा, पुढे काय होईल याचीही कल्पना नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सकारात्मक ठेवणं हे महत्वाचं असतं. लॉकडाउनमध्ये सुरुवातीचे काही आठवडे मला त्रास झाला, पण आता सवय झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी टीम इंडियातले काही सहकारी, राजस्थान रॉयल्समधले काही सहकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गप्पा मारतोय. माझ्यामते खेळाडूसाठी स्पर्धा लवकरात लवकर सुरु होणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीत आयपीएल स्पर्धा संपूर्ण देशाचा माहोल बदलू शकते.” एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत संजू सॅमसन बोलत होता.

२९ मार्चला सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सध्याच्या घडीला भारतात कोणत्याही प्रकारे क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भारतीय खेळाडू आता मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.