राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षी मिळवलेल्या यशानंतर आम्ही अनावश्यक दडपण घेतले. त्याचा परिणाम कामगिरीवर झाला. परंतु दडपणाची स्थिती हाताळण्यातील परिपक्वतेमुळे थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकू शकलो, असे भारताच्या चिराग शेट्टीने मंगळवारी सांगितले.

चिरागने सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या साथीने रविवारी इतिहास घडवताना थायलंड स्पर्धेच्या रूपाने ‘बीडब्ल्यूएफ सुपर ५००’ दर्जाची स्पर्धा प्रथमच जिंकण्याचा पराक्रम दाखवला. या स्पर्धेतील यशाचे विश्लेषण करताना मुंबईचा चिराग म्हणाला, ‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर अपेक्षा वाढल्यामुळे दडपण मोठय़ा प्रमाणात वाढले. त्यामुळे तीन स्पर्धामध्ये पहिल्या फेरीत आमचे आव्हान संपुष्टात आले. परंतु थायलंडच्या स्पर्धेत आम्ही प्रथमच दडपण योग्य पद्धतीने हाताळले. या स्पर्धेत आमच्या परिपक्वतेची कसोटी ठरली. आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेने उत्तम पद्धतीने दडपण हाताळले.’’

‘‘पुरुष दुहेरीत भारतासाठी आता आशादायी पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुलपेक्षा आव्हानात्मक प्रतिस्पर्धी थायलंडच्या स्पर्धेत होते. आता ऑलिम्पिक स्पर्धा जवळ आल्यामुळे सर्वच देशांचे खेळाडू त्या दृष्टीने गांभीर्याने खेळत आहेत,’’ असे चिराग म्हणाला.

दुहेरीतील पहिले विजेतेपद मिळवल्यानंतर चिरागने १९ ऑगस्टपासून बॅसेल येथे सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेकडे लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेत आमच्यापुढे खडतर आव्हान असेल. परंतु यंदाच्या वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावला आहे.’’

सात्त्विक-चिराग जोडीची नवव्या स्थानावर मुसंडी

नवी दिल्ली : थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावणाऱ्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरीतील जोडीने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सात स्थानांनी आगेकूच करताना नवव्या स्थानावर मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे मनू अत्री आणि बी सुमित रेड्डी या पुरुष दुहेरीतील जोडीने आपले २५वे स्थान टिकवले आहे.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत (१०वे स्थान), समीर वर्मा (१३), बी. साईप्रणीत (१९), एच. एस. प्रणॉय (३१) आणि सौरव वर्मा (४४) यांनी आपले क्रमवारीतील स्थान कायम राखले आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपले अनुक्रमे पाचवे आणि आठवे स्थान कायम राखले आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी एक स्थानाने आगेकूच करत २३वे स्थान मिळवले आहे.