भारताच्या विश्वनाथन आनंदला विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ग्रेनके क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंद सहाव्या क्रमांकावर फेकला गेला.
चौथ्या फेरीच्या या डावात आनंदने सुरुवातीला आघाडी घेतली होती, मात्र ३२व्या चालीला त्याने केलेली घोडचूकच त्याच्या पराभवाला कारणीभूत ठरली. कार्लसनने प्याद्यांचा कल्पकतेने उपयोग करीत आनंदवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या आनंदला खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. अखेर ३६व्या चालीला आनंदने पराभव मान्य केला. आनंदने आतापर्यंत दीड गुण मिळवले आहेत. जर्मनीच्या अर्कादिज नैदितिशने आपलाच सहकारी डेव्हिड बारामिझवर मात करीत आघाडी स्थान घेतले आहे. त्याचे तीन गुण झाले आहेत. कार्लसन व इटलीच्या फॅबिआनो कारुआना यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत. कारुआनाने इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सविरुद्ध बरोबरी स्वीकारली.