भारताचा पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने व्लादिमीर क्रॅमनिकला बरोबरीत रोखून आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत आघाडी कायम राखली. चौथ्या फेरीअखेर त्याचे तीन गुण झाले आहेत.
आनंदने पहिल्या तीन फेऱ्यांपैकी दोन डावांत आकर्षक खेळ करत विजय मिळवला होता. क्रॅमनिकविरुद्धच्या डावात आनंदला बरोबरी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. क्रॅमनिकला काळय़ा मोहरांच्या साहाय्याने खेळावे लागले तरीही त्याने सुरेख डावपेच करत आनंदला विजय मिळविण्याची संधी दिली नाही. त्याने व्हिएन्ना तंत्राचा उपयोग केला. आनंदने त्याच्या चालींना योग्य उत्तर देत डाव बरोबरीत ठेवण्यात समाधान मानले.
लिव्हॉन अरोनियन व क्रॅमनिक यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले असून ते संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अरोनियनने पीटर स्विडलर याच्यावर मात केली. स्विडलर आणि टोपालोव्ह दोन गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. सर्जी कर्जाकिन याला व्हॅसेलिन टोपालोव्हविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. शाख्रीयार मामेद्यारोव्ह व दिमित्री आंद्रेयकीन यांच्यातील डावही अनिर्णीत राहिला.
स्पर्धेच्या १० फेऱ्या अद्याप शिल्लक असल्या तरी या स्पर्धेत कोण विजेता ठरेल, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र पुढील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी आनंद, क्रॅमनिक आणि अरोनियन यांच्यात चुरस असणार आहे.