भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला नेदरलँड्सच्या अनीष गिरी याने बरोबरीत रोखून टाटा स्टील करंडक बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित धक्का दिला. पी.हरिकृष्ण या भारतीय खेळाडूने अव्वल दर्जाचा खेळाडू फॅबिआनो कारुआना याला बरोबरीत रोखले.
गिरी याच्याविरुद्धच्या डावात आनंदला विजयाच्या दृष्टीने चांगली संधी होती. मात्र डावाच्या शेवटी गिरीने आनंदला तुल्यबळ लढत देत त्याला डाव बरोबरीत ठेवण्यास भाग पाडले. एका स्थितीला आनंद पराभवाच्या छायेत सापडला होता, त्यामुळे त्याने डावाच्या शेवटी धोका न पत्करता बरोबरीचा प्रस्ताव स्वीकारला. हरिकृष्ण याने दीड गुणांसह दुसऱ्या फेरीअखेर रशियाच्या सर्जी कर्जाकिन याच्या साथीत संयुक्त आघाडी मिळविली. आनंद हा तिसऱ्या स्थानावर आहे. महिलांची विश्वविजेती खेळाडू यिफान होऊ (चीन) व अनीष गिरी यांचा प्रत्येकी अर्धा गुण झाला आहे.