आइल ऑफ मॅन बुद्धिबळ स्पर्धा

विश्वनाथन आनंदने आइल ऑफ मॅन बुद्धिबळ स्पध्रेच्या चौथ्या फेरीत एम. श्याम सुंदरवर एकतर्फी विजय मिळवला. याचप्रमाणे विदित गुजराथीने आर. प्रज्ञानंदची स्वप्नवत वाटचाल रोखली.

दोन लढती बरोबरीत सुटल्यानंतर आनंदला सूर गवसला आणि त्याने चेन्नईचाच ग्रॅण्डमास्टर श्यामसुंदरचा ३७ चालींमध्ये पराभव केला. आनंदने शिलेमॅन गॅम्बिटला प्रत्युत्तर देताना रुई लोपेझ पद्धतीचा वापर केला. सामन्याच्या मध्यावरच आनंदने उत्तम नियंत्रण मिळवले. याचप्रमाणे माजी कनिष्ठ विश्वविजेत्या अभिजीत गुप्ताने व्हिएतनामच्या लिएम ली क्वांगचा पराभव केला, तर बी. अधिबानने अमेरिकेच्या वेस्ले सो याला बरोबरीत रोखले.

चौथ्या फेरीअखेरीस अर्काडिज नॅडिश आणि वँग हाओ यांनी प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. मॅक्झिमे व्हॅचिअर-लॅग्रेव्ह, रॅडोस्लाव वोज्टासझेक, रिचर्ड रॅपोर्ट, विदित गुजराथी जेफ्री शिआँग, मिर्सीआ-ईमिलियन पार्लिग्रास आणि अभिजीत गुप्ता प्रत्येकी साडेतीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.