भारताच्या विश्वनाथन आनंदला ग्रेनकेन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला शेवटच्या फेरीत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सकडून पराभव स्वीकारावा लागला.
आनंद याला या स्पर्धेत केवळ अडीच गुण मिळाले. त्याला या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे पंधरा मानांकन गुणही गमवावे लागले. त्यामुळे जागतिक क्रमवारीत तो नवव्या क्रमांकावर फेकला गेला. त्याला अ‍ॅडम्सविरुद्धच्या डावातील शेवटच्या टप्प्यात आपल्या चालींवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत अ‍ॅडम्सने कल्पक चाली करीत विजय मिळविला.
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. त्याने फ्रान्सच्या एटिनी बॅक्रोट याच्याविरुद्ध झालेल्या लढतीत बरोबरी स्वीकारली, तर अर्कादिज नैदितिशला लिवॉन अरोनियन याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवावा लागला. या बरोबरीमुळे कार्लसन व अर्कादिज नैदितिश (जर्मनी) यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले. विजेता ठरविण्यासाठी त्यांच्यात टायब्रेकर डावांचा उपयोग करण्यात आला. पहिल्या दोन डावांमध्ये त्यांनी प्रत्येकी एक डावजिंकला. त्यामुळे आणखी एक डाव खेळविण्यात आला. त्यामध्ये कार्लसन याने बाजी मारली.