विजयासाठी संघर्ष करणाऱ्या विश्वनाथन आनंदला अखेर सूर गवसला. आनंदने विज्क अ‍ॅन्झी येथे सुरू असलेल्या टाटा स्टील चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी इटलीच्या फॅबिआनो कारुआना याच्यावर शानदार विजय मिळविला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आनंदला विजयापासून वंचित राहावे लागले होते. त्याने तिसऱ्या फेरीत कारुआना याच्याविरुद्ध प्रेक्षणीय खेळ करीत विजयश्री संपादन केली. आनंदने भारताचा पी. हरिकृष्ण तसेच नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यासमवेत संयुक्त दुसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. हरिकृष्ण याने खराब स्थिती असताना चिवट लढत देत जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित खेळाडू लिवॉन आरोनियन याला बरोबरीत रोखले. रशियाच्या सर्जी कर्झाकिन याने चीनच्या वाँग हाओवर मात करीत आघाडी घेतली. त्याचे अडीच गुण झाले आहेत.