भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने ल्युक मॅकशेन या स्थानिक खेळाडूवर लागोपाठ दुसरा विजय मिळवत लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले. आनंदने फ्रान्सच्या आंद्रे इस्ट्रातेस्कू याच्यावरही सफाईदार विजय मिळविला होता. त्याने मॅकशेनविरुद्धचा डाव जिंकून बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. त्याचे १० गुण झाले आहेत. मायकेल अॅडम्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर मॅकशेनचे चार गुण झाले आहेत. आंद्रेला अद्याप एकही गुण मिळविता आलेला नाही.
मॅकशेनविरुद्ध आनंदने वजिरापुढील प्याद्याच्या साहाय्याने सुरुवात केली. डावाच्या मध्यावर आनंदने प्रतिस्पध्र्याच्या राजाच्या बाजूवर आक्रमण केले. त्याने उंटाचा बळी देत मॅकशेनला संभ्रमात टाकले. डाव वाचविण्यासाठी मॅकशेनला वजीर गमवावा लागला. त्यामुळे अखेर त्याने ३८व्या चालीला पराभव मान्य केला. या लढतीपूर्वी आनंदने आंद्रेवर ५० चालींमध्ये मात केली. त्याने सिसिलीयन अॅलापिन तंत्राचा कल्पकतेने उपयोग केला. स्पर्धेतील ‘ब’ गटात रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक व पीटर स्वीडलर यांचे प्रत्येकी सात गुण झाले आहेत. ‘क’ गटात बोरिस गेल्फंड व हिकारू नाकामुरा यांचे प्रत्येकी आठ गुण झाले आहेत.  ‘ड’ गटात फॅबिआनो कारुआना याने दहा गुणांसह आघाडी घेतली आहे तर निगेल शॉर्ट हा सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.