विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला ताल बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यामुळे त्याची संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या वर्षीच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीतील प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे आनंदसाठी हा पराभव म्हणजे धोक्याचा इशारा समजला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात चेन्नई येथे आनंद आणि कार्लसन यांच्यात होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीआधी या दोन प्रतिस्पध्र्यामधील हा अखेरचा क्लासिकल सामना होता. पण योग्य रणनीतीच्या अभावामुळे आनंदवर नॉर्वेचा युवा बुद्धिबळपटू कार्लसनने मात केली. रशियाच्या अलेक्झांडर मोरोझेव्हिचविरुद्ध विजय मिळवून या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करणाऱ्या इस्रायलच्या बोरिस गेल्फंडने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासह संयुक्तपणे ३.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
निम्झो इंडियन बचाव पद्धतीद्वारे सुरुवात करून कार्लसनने आनंदला सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. आनंदने कार्लसनचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. पण कार्लसनने पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा उठवत २५व्या चालीलाच विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती.

 ‘‘आनंद आणि माझ्यातील बऱ्याचशा लढती बरोबरीत सुटल्या आहेत. पण विश्वविजेतेपदाच्या लढतीआधी मी आनंदला हरवले, हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. आता मी विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज होत आहे!’’                      -मॅग्नस कार्लसन