माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला सिंक्वेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराकडून पराभवाचा धक्का बसला.
कॅटलान पद्धतीच्या डावात आनंदला नाकामुराविरुद्ध बरोबरी करण्याची संधी मिळाली होती, मात्र त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. आनंदकडून झालेल्या नकळत चुकांचा फायदा घेत नाकामुरा याने ४० व्या चालीला एका प्याद्याची आघाडी घेतली. त्यानंतर पराभव अटळ आहे हे लक्षात येताच आनंदने ४३ व्या चालीस शरणागती स्वीकारली. बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्हने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. नेदरलँड्सच्या अनिष गिरीने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुकवर अनपेक्षित विजय मिळविला. लिवॉन आरोनियन या अर्मेनियाच्या खेळाडूने अमेरिकन खेळाडू फॅबिआनो कारुआनाचा पराभव केला. फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्हने विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविलेल्या वेस्ली सो याला पराभूत केले.