ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत कसोटी मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे.
१९४७ सालापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये ज्या कामगिरीची वाट पाहत होता, अखेर तो दिवस आज उजाडला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने २-१ च्या फरकाने विजय मिळवला. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवसात भारताला विजयाची चांगली संधी होती. मात्र अंधुक प्रकाश आणि पावसाने भारताच्या इराद्यावर पाणी फिरवलं. अखेर दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करुन दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णीत घोषित केला. या मालिका विजयानंतर ट्विटवरुन भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये अनेक बड्या व्यक्तींनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. अभिनंद करणाऱ्यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन भारतीय संघाला या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे चाहते आहेत. भारतीय संघाच्या विजयानंतर ट्विट करताना त्यांनी या विजयाचे महत्व नवीन पिढीला इतके कळणार नाही जितके ते आम्हाला कळतेय असे मत व्यक्त केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘भावनिक दृष्ट्या हा विजय किती महत्वाचा आहे हे माझ्या पिढीच्या लोकांना आजच्या तरुण पिढीला समजवून सांगता येणे कठीण आहे. अनेक दशके आपल्याला संघर्ष करावा लागला आहे. आपण परदेशी मैदानांवर कसोटी मालिका जिंकू शकत नाही असा मानसिकतेमध्ये होते. पण आपण आज विजय मिळवला. भूतकाळाला निरोप देत भविष्याचे स्वागत करुयात.’

भारतीय संघाचा विजय अनेक अर्थांने महत्वाचा आहे असेच आनंद महिंद्रांना या ट्विटमधून सुचवायचे आहे. भारताने ऑस्ट्रेलियन मैदानांवर घरच्या संघाबरोबर कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केल्यापासून हा पहिलाच मालिका विजय आहे. त्यामुळेच आनंद महिंद्रांसारख्या जुन्या जाणत्या क्रिकेट चाहत्यांनी व्यक्ती केलेली ही भावना बरंच काही सांगून जाते.