आव्हानवीर मॅग्नस कार्लसन हा जरी जगातील सर्वात चाणाक्ष तरुण बुद्धिबळपटू असला तरी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने त्याच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, याचाच प्रत्यय विश्वविजेतेपदाच्या लढतीत दिसून आला. आनंदने सहा तासांच्या झुंजीनंतर चुरशीच्या लढतीत चौथा डाव बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. चार डावांच्या अखेरीस दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत.
आनंद व कार्लसन यांच्यातील पहिले तीन डाव बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या डावाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या डावात पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याची संधी आनंदला मिळाली होती. त्याने अपेक्षेनुसार राजाच्या पुढील प्यादाने डावाचा प्रारंभ केला. त्याला कार्लसनने बर्लिन बचावात्मक पद्धतीने उत्तर दिले. व्लादिमीर क्रॅमनिकने गॅरी कास्पारोव्हविरुद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत याच तंत्राचा उपयोग कल्पकतेने केला होता. या तंत्राचा उपयोग करीत त्याने अनेक वेळा कास्पारोव्हला जेरीस आणले होते.
आनंद व कार्लसन यांच्यात रंगतदार खेळाची पर्वणी चाहत्यांना लुटता आली. या दोघांनी आठव्या चालीतच एकमेकांच्या वजिरांचा बळी दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेत डावावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. डावाच्या मध्यात कार्लसनला विजय मिळविण्याची संधी चालून आली होती. त्याने हत्तीचा बळी दिला असता, तर त्याला आनंदच्या दोन प्याद्यांसह हत्तीजिंकता आला असता. आपोआपच त्याला विजयासाठी चांगली व्यूहरचना मिळाली असती. त्या वेळी वेळेच्या बंधनात चाली करण्याबाबत कार्लसनची बाजू चांगली होती. त्यामुळे थोडासा धोका पत्करून आनंदवर आक्रमणही तो करू शकत होता. मात्र कार्लसनने हत्ती मागे घेत ही संधी गमावली.
डावाच्या शेवटच्या टप्प्यात आनंदकडे दोन हत्ती व दोन प्यादी अशी स्थिती होती तर कार्लसन याच्याकडे दोन हत्ती व तीन प्यादी अशी स्थिती होती. आनंदने प्याद्याचे वजिरात रूपांतर करण्यासाठी केलेला प्रयत्न कार्लसन याने हाणून पाडला. ६०व्या चालीस आनंदकडे एक प्यादे व दोन हत्ती अशी स्थिती होती तर कार्लसन याच्याकडे दोन हत्ती व तीन प्यादी अशी भक्कम स्थिती होती. या स्थितीत कार्लसनला विजय मिळविण्यासाठी पुन्हा एकदा चांगली संधी चालून आली होती. पण जिगरबाज आनंदने हत्ती व प्यादाचा बळी देत कार्लसन याचा एक हत्ती व दोन प्यादी मिळविली. त्यामुळे हा डाव जिंकण्याचे कार्लसनचे मनसुबे धुळीस मिळाले. ६४व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.
आता एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पाचवा डाव रंगणार आहे. या डावात कार्लसनला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळणार आहे. पहिले चारही डाव बरोबरीत सुटल्यामुळे बुद्धिबळाचा सम्राट कोण होणार, ही उत्सुकता हळूहळू शिगेला पोहोचू लागली आहे. आनंदने कार्लसनचे डावपेच प्रत्येक वेळी हाणून पाडल्यामुळे ही लढत रंगतदार होणार, हे निश्चित.
“पराभवाच्या छायेतून डाव बरोबरीत सोडविल्यामुळे समाधान वाटत आहे. डावात दोन वेळा माझा पराभव दिसत होता. मात्र कार्लसनला अपेक्षेनुसार या संधींचा लाभ घेता आला नाही. डावाच्या सुरुवातीला अपेक्षेनुसार चाली झाल्या नाहीत. विशेषत: घोडय़ाच्या चाली करण्याबाबत मी कमी पडलो. कार्लसनने बर्लिन बचावात्मक पद्धतीद्वारे अनेक डाव जिंकले आहेत. डावाच्या शेवटीही त्याला विजय मिळविण्याची संधी मिळाली होती. मात्र सुदैवाने माझ्या डावपेचांना यश मिळाले व डाव वाचवू शकलो.”

विश्वनाथन आनंद
“माझा खेळ अपेक्षेनुसारच झाला. हा डाव बरोबरीत ठेवल्याचेच मला समाधान वाटत आहे. मी जेव्हा एक प्यादे जिंकले, त्यावेळी सकारात्मक चाली करत डाव जिंकण्याचे माझे प्रयत्न होते. आनंदने जिद्दीने चाली केल्या अन्यथा त्याचा पराभव स्पष्ट झाला होता. हत्तीच्या साहाय्याने शेवटी मला अपेक्षेनुसार डावपेच करता आले नाहीत. त्यामुळेच बरोबरी पत्करावी लागली.”

मॅग्नस कार्लसन