पाच वेळा विश्वविजेता असलेला विश्वनाथन आनंद या भारताच्या ग्रँडमास्टर खेळाडूला लागोपाठ दोन बरोबरींमुळे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर संयुक्त नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत आनंदचे साडेतीन गुण झाले आहेत. रशियाचे सर्जी कर्जाकिन व इयान नेपोम्नियाची तसेच इटलीचा फॅबिआनो कारुआना यांनी प्रत्येकी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचे चार गुण झाले आहेत. भारताच्या पी. हरीकृष्ण व देवाशिष दास यांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन गुणांची कमाई केली आहे. सूर्यशेखर गांगुली, एम. शामसुंदर व श्रीराम झा यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत.
आनंद याने या स्पर्धेत स्पेनचा साल्गादो लोपेझ व रशियाच्या मॅक्झिम मॅटलोकोव्ह यांच्याविरुद्धचे डाव बरोबरीत ठेवले. त्याने भारताचा संदीपन चंदा व रशियाचा व्लादिमीर फेदोसीव्ह यांच्यावर आकर्षक विजय मिळविला. पाचव्या फेरीत त्याला चेक प्रजासत्ताकच्या व्हिक्टर लॅझ्निकाने बरोबरीत रोखले. आनंदला सहाव्या फेरीत युक्रेनच्या जहार एफिमेन्कोव्हशी खेळावे लागणार आहे. या डावात त्याला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा मिळणार आहे.