पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने संधीचा पुरेपूर फायदा उठवत स्पेनच्या फ्रान्सिस्को व्हॅलेजो पॉन्स याच्यावर दुसऱ्या फेरीत मात केली. या विजयासह आनंदने बिलबाओ फायनल मास्टर्स स्पर्धेत सहा गुणांनिशी अव्वल स्थान पटकावले आहे.
तांत्रिकदृष्टय़ा आपण किती सक्षम आहोत, हे आनंदने या लढतीद्वारे दाखवून दिले. या सामन्यात सुरेख कल्पना पटावर अमलात आणत आनंदने व्हॅलेजोला अडचणीत आणले. या संधीचा फायदा घेत आनंदने हा सामना जिंकला. दुसऱ्या फेरीअखेर आनंदने आघाडी घेतली असून चार खेळाडूंच्या या स्पर्धेत आनंदची पुढील लढत अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियानशी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात अरोनियानने युक्रेनच्या रस्लन पोनोमारिओव्हला हरवले.
आनंदने काळ्या मोहऱ्यांसह रॅगोझाइन बचाव पद्धतीचा अवलंब करत सुरुवात केली. आनंदकडून ही सुरुवात अपेक्षित नसल्यामुळे व्हॅलेजो बुचकळ्यात पडला. आनंदने हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवत व्हॅलेजोवर दडपण आणले. त्यानंतर व्हॅलेजोने केलेली चूक आनंदच्या पथ्यावर पडली. आनंदने कोणतीही चूक न करता व्हॅलेजोला ‘चेकमेट’ केले. या विजयाद्वारे आनंदने नोव्हेंबर महिन्यात मॅग्नस कार्लसनविरुद्ध होणाऱ्या विश्वविजेतेपदासाठीच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. ‘‘या विजयावर मी समाधानी असलो तरी अद्याप बरीच लढाई बाकी आहे. यापुढेही खेळात सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे आनंदने सांगितले.