महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी खो-खो आणि वेटलिफ्टिंगमध्ये एकूण चार सुवर्णपदके पटकावली. याचप्रमाणे ४९ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. युवा विभागाच्या ६१ किलो गटात अनिरुद्ध निपणेने तर दुसरे सुवर्णपदक अनन्या पाटीलने (२१ वर्षांखालील) ५५ किलो गटात पटकावले.

खो-खोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

२१ वर्षांखालील गटातील मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा १६-१४ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते. परंतु उत्तरार्धात महाराष्ट्राने पळतीमध्ये सुरेख कौशल्य दाखवत फक्त पाचच गडी गमावले. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला. विजयात निहार दुबळे, संकेत कदम, दिलीप खांडवी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला. पूर्वार्धात महाराष्ट्राकडे ९-२ अशी मोठी आघाडी होती. महाराष्ट्राच्या विजयात प्रियांका भोपी, रेश्मा राठोड, अपेक्षा सुतार, काजल भोर यांनी योगदान दिले.

जलतरण : सुवर्णपदकांची कमाई सुरूच  : मुलींनी जलतरणात आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. मुलींच्या (१७ वर्षांखालील) गटात महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिलेचे सुवर्णपदक पटकावले. अपेक्षा फर्नाडिस, करिना शांता, कियारा बंगेरा आणि केनिशा गुप्ता यांचा समावेश या संघात होता. मुलींच्या (२१ वर्षांखालील) गटातही महाराष्ट्राने या शर्यतीचे विजेतेपद मिळविले. ऋतुजा तळेगावकर, राधिका गावडे, युगंधरा शिर्के आणि साध्वी धुरी यांचा समावेश संघात होता.