ऑस्ट्रेलियाचे तिसऱ्या कसोटीसह मालिकेत निभ्रेळ यश
कठीण परिस्थितीतून सावरत संघाला विजयापर्यंत नेण्याची किमया साधणे, हीच ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज माइक हसीची खासियत. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातही हसी आपल्या वैशिष्टय़ाला जागला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने ५ बाद १४१ धावा करीत श्रीलंकेवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या हसीला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि क्रिकेटरसिकांनी यथोचित अलविदा केला.
रविवारी सकाळच्या सत्रात दिनेश चंडिमलच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेने दुसऱ्या डावात २७८ धावा केल्या. श्रीलंकेचे विजयासाठीचे आव्हान तुटपुंजे होते. परंतु फिरकी गोलंदाज रंगना हेराथ आणि तिलकरत्ने दिलशान यांनी ठराविक अंतराने बळी मिळविल्यामुळे ऑस्ट्रेलियाला लक्ष्य गाठणे अवघड गेले. पण सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला. त्यानंतर ईडी कोवान ३६, फिल ह्युजेस ३ आणि मायकेल क्लार्क २९ यांच्या फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचे आव्हान पेलले. हसी २७ धावांवर नाबाद राहिला. आपल्या शानदार कसोटी कारकिर्दीत हसीने ५१.५२च्या सरासरीने ६२३५ धावा केल्या आहेत. जॅक्सन बर्डनला सामनावीर, तर मायकेल क्लार्कला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी क्लार्कला विश्रांती
श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला विश्रांती देण्यात आली आहे. मांडीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी क्लार्कला पुरेसा अवधी मिळावा, याकरिता त्याला विश्रांती देण्यात आली आहे. ११ आणि १३ जानेवारीला अनुक्रमे मेलबर्न आणि अ‍ॅडलेडला होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या मायकेल हसी याच्यासह डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू व्ॉड, डॅन ख्रिस्तियन आणि जेम्स पॅटिन्सन यांना १३ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
ऑस्ट्रेलियाचा संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), बेन कटिंग, झेव्हियर डोहर्टी, आरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, फिलिप ह्युजेस, डेव्हिड हसी, मिचेल जॉन्सन, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, क्लिंट मकाय, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.