श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (८८४ गुण) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या यादीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले.

भारताच्या रविचंद्रन अश्विनने (८७१ गुण) आपले दुसरे स्थान टिकवून ठेवले आहे. याशिवाय रवींद्र जडेजा (७८९ गुण) सहाव्या स्थानावर आहे.

अँडरसनने पहिल्या डावात ३६ धावांत ३ बळी घेतले, तर दुसऱ्या डावात ५८ धावांत ५ बळी घेतले. या कामगिरीसह त्याने अव्वल स्थान काबीज करताना सहकारी स्टुअर्ट ब्रॉड आणि अश्विनला मागे टाकले. गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान काबीज करणारा अँडरसन हा चौथा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. याआधी इयान बोथम (१९८०), स्टीव्ह हार्मिसन (२००४) आणि ब्रॉड (२०१६) यांनी हा पराक्रम साधला आहे.