06 March 2021

News Flash

मुंबई संघाची पसंती अंधेरी क्रीडा संकुलाला

१ ऑक्टोबरला गुवाहाटी येथून तिसऱ्या हंगामाची सुरुवात

आयएसएलचे सामने यंदा डी. वाय. पाटील स्टेडियमवर नाही; १ ऑक्टोबरला गुवाहाटी येथून तिसऱ्या हंगामाची सुरुवात

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेचा तिसरा हंगाम मुंबईतील फुटबॉल चाहत्यांसाठी आंनदाची वार्ता घेऊन आला आहे. आयएसएलमधील मुंबई सिटी एफसी क्लबचे सामने पाहण्यासाठी नवी मुंबईपर्यंत कराव्या लागणाऱ्या प्रवासाच्या त्रासापासून चाहत्यांची सुटका झालेली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी क्रीडा संकुलात आयएसएसचे सामने खेळविण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई सिटी एफसीचा मालक व बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याने शुक्रवारी केली.

‘‘गेल्या दोन हंगामात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरूनही चाहत्यांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला. त्यामुळे त्यांचे आम्ही देणे लागतो आणि त्यामुळेच मुंबईत आयएसएलचे सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न होता. अंधेरी येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलामुळे या प्रयत्नांना यश आले. चाहत्यांनाही येथे येणे सोपे जाणार आहे. आदित्य ठाकरे, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन, मुंबई महानगरपालिका आणि स्टेडियममधील प्रत्येकाने आम्हाला दिलेला पाठिंबा उल्लेखनीय होता. त्यामुळे येथे खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे मत रणबीर कपूरने व्यक्त केले.

आयएसएलच्या तिसऱ्या हंगामाला १ ऑक्टोबरपासून गुवाहाटी येथून सुरुवात होणार आहे. यजमान नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात सलामीचा सामना गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ७९ दिवस चालणाऱ्या या स्पध्रेत एकूण ६१ सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पध्रेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

अ‍ॅटलेटिकोनेही स्थळ बदलले

पुढील वर्षी होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे काही सामने कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे आयएसएलच्या सामन्यासाठी यंदा हे स्टेडियम उपलब्ध नसणार आहे. याचा अंदाज घेत अ‍ॅटलेटिको दी कोलकाताने तीन स्टेडियमची पाहणी केली असून त्यातील रवींद्र सरोवर स्टेडियमवर सामने खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. २ ऑक्टोबरला चेन्नईयन एफसीविरुद्ध कोलकाता पहिला सामना खेळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:55 am

Web Title: andheri sports complex
Next Stories
1 रोनाल्डो दुसऱ्यांदा युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी
2 डिसेंबरमध्ये गामा कुस्ती विश्वचषकाची रंगत
3 ऐतिहासिक कामगिरीची सेरेनाला संधी
Just Now!
X