कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना जमैका संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा रुद्रावतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. त्रिंबागो नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात रसेलला पंचाच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरावं लागलं. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलने एका चेंडूवर बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू चेंडू हा रसेलच्या पॅडला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या हाती गेला. नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी यावर रसेल बाद असल्याचं अपिल केलं, जे पंचांनी उचलून धरलं.

पंच नायजेल डग्वाइड यांनी रसेल बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर रसेलला सर्वप्रथम विश्वासच बसेना. परंतू CPL मध्ये DRS ची संधी नसल्यामुळे रसेलला माघारी परतणं भाग होतं. यामुळे संतापलेल्या रसेलने रागात आपली बॅट मैदानात आटपून आपला राग व्यक्त केला.

भारतीय खेळाडू अभिनव मुकुंदनेही CPL सारख्या स्पर्धेत DRS ची सुविधा नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

दरम्यान नाईट रायडर्स संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना जमैकाला १०७ धावसंख्येवर रोखलं. कायरन पोलार्डच्या नाईट रायडर्स संघाने हे आव्हान सहज पूर्ण करत आपली विजयी घौडदौड कायम राखली. या विजयासह नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे.