ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमंड्स याने बऱ्याच वर्षांनंतर Monkeygate प्रकरणावर भाष्य केलं आहे. २००८ साली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाजलेल्या Monkeygate प्रकरणामुळे आपलं करिअर संपुष्टात आल्याचं सायमंड्स म्हणाला. सिडनी कसोटीदरम्यान सायमंड्सने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहवर वर्णद्वेशी टिपणी व आपल्याला माकड म्हटल्याचा आरोप केला होता. हरभजनने मात्र हे आरोप फेटाळले होते. या घटनेनंतर हरभजन सिंहवर ३ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र बीसीसीआयने मालिका अर्ध्यावर सोडून माघारी परतण्याची धमकी दिल्यानंतर हरभजनची शिक्षा रद्द करण्यात आली.

“त्या घटनेनंतर माझ्या कारकिर्दीतला उतरता काळ सुरु झाला. मी त्या कालावधीत खूप दारु प्यायला लागलो, आणि याचा परिणाम माझ्या खेळावर झाला. माझ्यामुळे माझे इतर सहकारीही या प्रकरणात ओढले गेले आणि याचा मला चांगलाच त्रास झाला.” ऑस्ट्रेलियान ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनशी बोलत असताना ४३ वर्षीय सायमंड्सने Monkeygate प्रकरणात आपली बाजू मांडली. २००९ साली सायमंड्स ऑस्ट्रेलियाकडून आपला अखेरचा सामना खेळला.

२००९ सालानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सायमंड्ससोबतचा करार रद्द केला, मध्यंतरीच्या काळात सायमंड्सने दारु पिऊन संघाची शिस्त मोडल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र हरभजनने आपल्याविरोधात वर्णद्वेशी टिपणी केल्याच्या वक्तव्यावर सायमंड्स अजुनही ठाम आहे. त्या प्रकरणानंतर आपण स्वतः भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमबाहेर जात हरभजनशी संवाद साधल्याचं सायमंड्स म्हणाला होता. यावेळी आपण स्वतः हरभजनला हे प्रकरण थांबवण्याची विनंती केली होती असंही सायमंड्सने स्पष्ट केलं.