ग्रँडस्लॅम स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या अँडी मरे या इंग्लंडच्या खेळाडूला येथे पुढील महिन्यात होणाऱ्या एटीपी टेनिस अंतिम स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्याने येथील व्हॅलेंसिया स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले.
मरे याने व्हॅलेंसिया स्पर्धेतील डेव्हिड फेरर याच्यावर ५-७, ६-२, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. त्याने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. मरे याने सांगितले,की एटीपी स्पर्धेत विजेतेपद मिळविणे अवघड असले तरी मी तेथे सर्वोत्तम कामगिरी करीत हे ध्येय साध्य करीन. येथील अंतिम फेरीत माझा खेळ समाधानकारक झाला.
एटीपी अंतिम स्पर्धेसाठी केई निशिकोरी, टॉमस बर्डीच, मिलोस राओनिक व ग्रिगोर दिमित्रोव्ह यांनीही पात्रता निश्चित केली आहे. बर्डीच याने स्टॉकहोम येथील एटीपी स्पर्धेत दिमित्रोव्ह याच्यावर ५-७, ६-४, ६-४ असा विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली. एटीपी कारकिर्दीत त्याचे हे दहावे विजेतेपद आहे.
फेरर हा पुढील आठवडय़ात होणाऱ्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो म्हणाला, तेथे मी अव्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.