जेतेपद राखण्यासाठी उत्सुक असलेल्या तिसऱ्या मानांकित अँडी मरेने विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. महिलांमध्ये व्हीनस विल्यम्स, लि ना, अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्का यांनी आपापल्या लढती जिंकत विजयी आगेकूच केली. भारताच्या पुरव राजाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुष गटात गतविजेत्या मरेने आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत एकतर्फी विजय मिळवला. त्याने दुसऱ्या फेरीत स्लोव्हाकियाच्या बियाझ रोला याचा ६-१, ६-१, ६-० असा केवळ ८४ मिनिटांमध्ये धुव्वा उडविला. महिलांमध्ये व्हीनस विल्यम्सने जपानच्या कुरुमी नारावर ७-६ (७-४), ६-१ अशी मात केली. १४व्या मानांकित अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्काने ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलाक्युएवर ६-४, ६-० अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. द्वितीय मानांकित लि ना हिने ऑस्ट्रियाच्या पिओनी मेसबर्जरचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. पेट्रा क्विटोव्हाने मोना बार्थेलचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. व्हेरा व्होनारेव्हाने तारा मूरला ६-४, ६-७ (३-७), ९-७ असे नमवले. आंद्रेय कुझनेत्सोव्हने डेव्हिड फेररचे आव्हान ६-७ (५-७), ६-०, ३-६, ६-३, ६-२ असे संपुष्टात आणले.
याचप्रमाणे पुरव राजा आणि ब्राझीलचा मार्सेलो डीमोलीनर यांना जुआन कॅबोल (कोलंबिया) व मार्टिन मॅटकोवस्की (पोलंड) यांनी ६-२, ६-४, ६-४ असे हरविले. भारताच्या दिविज शरण यालाही पराभूत व्हावे लागले. चुरशीने झालेल्या लढतीत दिविज व चीन तेपैईच्या येन सुआन लिऊ यांना जेमी डेल्गाडो (इंग्लंड) व गिलेस म्युलर (लक्झेंबर्ग) यांनी २-६, २-६, ७-६ (७-५), ६-३, ६-२ असे पराभूत केले.