ईलाव्हेनिल-हृदय जोडीची सुवर्ण कामगिरी

आशियाई नेमबाजी स्पर्धा

कुवेत सिटी

अंगद वीर सिंग बाजवाने आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटातील स्कीट प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय स्कीट नेमबाज ठरला. तसेच भारताच्या ईलाव्हेनिल व्हालारीव्हान आणि हृदय हझारिका जोडीनेही १० मीटर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कनिष्ठ विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. याच प्रकारात मेहुल घोष आणि अर्जुन बबुटा यांनी कांस्यपदक मिळवले.

अंगदने अंतिम फेरीत ६० पैकी ६० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. चीनच्या जी जिन याने ५८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले तर यूएईच्या सईद अल मकतोउम याने ४६ गुणांसह कांस्यपदक पटकावले. अंगदने पात्रता फेरीत १२५ पैकी अन्य तीन नेमबाजांसह प्रत्येकी १२१ गुण प्राप्त केले होते.

ईलाव्हेनिल आणि हृदय जोडी पाच संघांच्या अंतिम फेरीसाठी प्राथमिक फेरीत ८३५.८ गुण मिळवत तिसऱ्या स्थानासह पात्र ठरले. प्राथमिक फेरीत मेहुली-अर्जुन जोडीने चौथ्या स्थानासह ८३३.५ गुण मिळवले.

४५ फैरींच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकविजेत्या जोडीने अप्रतिम सुरुवात केली. पहिल्या २० फैरींमध्ये ते दुसऱ्या स्थानावर होते, तर चीनची रौप्यपदक विजेती जोडी शि मेंगयावो आणि वांग युफेंग आघाडीवर होते. मात्र ईलाव्हेनिल आणि हृदय जोडीने ५०२.१ गुणांसह विश्व आणि आशियाई कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम नोंदवला. चीनच्या जोडीने ५००.९ गुण मिळवले, तर मेहुली-अर्जुन जोडीने ४३६.९ गुण मिळवले.