कर्बरची मात; पराभवाच्या छायेतून हॅलेप विजयी

खेळात यश मिळवताना नशिबाचीही साथ असते, असे म्हटले जाते. जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावरील खेळाडू सिमोना हॅलेपने तीन वेळा मॅच पॉइंट वाचवत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील आव्हान टिकवले. याचप्रमाणे माजी विजेत्या अँजेलिक कर्बरने मारिया शारापोव्हाचे यशस्वी पुनरागमनाचे स्वप्न धुळीस मिळवले.

हॅलेपने पावणेचार तास चाललेल्या लढतीत अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसवर ४-६, ६-४, १५-१३ अशी मात केली. चंदा रुबीनने १९९६ मध्ये येथे अरांचा सँचेझवर ४८ गेम्सच्या लढतीनंतर विजय मिळवला होता. या विक्रमाची हॅलेपने बरोबरी केली. कर्बरने पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या शारापोव्हाचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. उत्तेजक सेवनप्रकरणी दीड वर्षे स्पर्धात्मक बंदीला सामोरे गेलेल्या शारापोव्हाला यंदा येथे विजेतेपद मिळवत यशस्वी पुनरागमन करण्याची महत्त्वाकांक्षा होती. मात्र कर्बरच्या आक्रमक खेळापुढे तिचा प्रभाव पडला नाही. चेक प्रजासत्ताक कॅरोलिना प्लिस्कोवाने ल्युसी सॅफारोव्हाला पराभूत केले. तिसऱ्या फेरीतील रंगतदार लढतीत प्लिस्कोवाने ७-६ (८-६), ६-४ अशी विजय मिळवला.

वय वाढल्यानंतरही अव्वल कामगिरी करता येते, जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवता येते, हे सेरेना विल्यम्स व रॉजर फेडरर यांनी दाखवून दिले आहे. मला त्यांचीच प्रेरणा आहे. या स्पध्रेत पराभूत झाले तरी नाउमेद झालेले नाही. अजून भरपूर यश मिळवायचे आहे.

 मारिया शारापोव्हा

पेस आणि राजाची आगेकूच

मेलबर्न : भारताच्या लिएण्डर पेस व पुरव राजा यांनी मॅच पॉइंट वाचवत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्यांनी रोमहर्षक सामन्यात ब्रुनो सोरेझ (ब्राझील) व जेमी मरे (इंग्लंड) यांचा ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) असा पराभव केला. सोरेझ व मरे यांना पाचवे मानांकन देण्यात आले होते. पेस व राजा या बिगरमानांकित जोडीने गतवर्षी दोन चॅलेंजर स्पर्धा जिंकल्या आहेत. एकत्र खेळताना त्यांची ही दुसरीच ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.

फेडरर, जोकोव्हिच यांची झंझावाती घोडदौड

मेलबर्न : रॉजर फेडरर व नोवाक जोकोव्हिच यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सरळ तीन सेट्समध्ये मात करीत ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली.

गतविजेत्या फेडररने तुल्यबळ खेळाडू रिचर्ड गास्केटवर ६-२, ७-५, ६-४ असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन स्पध्रेचे पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररला दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये चिवट झुंज द्यावी लागली. डॉमनिक थिएमने आद्रियन मॅनारिनोचे आव्हान ६-४, ६-२, ७-५ असे संपुष्टात आणले.

हात दुखत असूनही जोकोव्हिचने अल्बर्ट रामोस विनोलासचा ६-२, ६-३, ६-३ असा पराभव केला. सहा महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक टेनिसपासून जोकोव्हिच दूर होता. . चुंगने चौथ्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर जेव्हेरेव्हवर ५-७, ७-६ (७-३), २-६, ६-३, ६-० असा रोमहर्षक विजय नोंदवला. टॉमस बर्डीचने जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत केले. बर्डीचने हा सामना ६-३, ६-३, ६-२ असा एकतर्फी जिंकला. फॅबिओ फोग्निनीने ज्युलियन बेनेटियूचा ३-६, ६-२, ६-१, ४-६, ६-३ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.

शारीरिकदृष्टय़ा शंभर टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे मला तिसऱ्या फेरीतील सामन्याच्या वेळी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. आता पुढच्या फेऱ्या अधिक महत्त्वाच्या आहेत. त्या वेळी संयमाने खेळले पाहिजे.

– नोवाक जोकोव्हिच

गास्केटवर मी जरी तीन सेट्समध्ये मात केली असली तरी तो अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. दुर्दैवाने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत त्याला अव्वल यश मिळाले असले तरी त्याचा खेळ अत्युच्च दर्जाचा आहे. मलादेखील शेवटपर्यंत गांभीर्याने खेळावे लागले.

– रॉजर फेडरर