फेडरर, निशिकोरीची विजयी सलामी

जर्मनीची पाचवी मानांकित आणि विम्बल्डनची विजेती अँजेलिक कर्बर हिला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा अडसर पार करता आला नाही. रशियाची युवा खेळाडू अ‍ॅनास्तेशिया पोटापोव्हा हिने कर्बरला पराभवाचा धक्का दिला. स्वित्र्झलडचा तृतीय मानांकित रॉजर फेडरर आणि जपानचा केई निशिकोरी यांनी विजयी सलामी दिली.

फ्रेंच खुल्या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पोटापोव्हा हिने कर्बरला ६-४, ६-२ असे पराभूत केले. फ्रेंच स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सहाव्यांदा पराभूत होण्याची नामुष्की कर्बर हिच्यावर ओढवली आहे. ‘‘या विजयामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. याचे श्रेय माझ्या प्रशिक्षकांना जाते,’’ असे जागतिक क्रमवारीत ८१व्या स्थानी असलेल्या पोटापोव्हा हिने सांगितले.

२०१५नंतर प्रथमच फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळणाऱ्या रॉजर फेडररने इटलीच्या जागतिक क्रमवारीत ७३व्या क्रमांकावर असलेल्या लॉरेंझो सोनेगो याचे आव्हान ६-२, ६-४, ६-४ असे सहज परतवून लावले. जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरीने फ्रान्सच्या क्वेन्टिन हॅलिस याला ६-२, ६-३, ६-४ अशी सहज धूळ चारली.

क्रोएशियाच्या ११व्या मानांकित मारिन चिलिचने इटलीच्या थॉमस फॅबियानोचा ६-३, ७-५, ६-१ असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात, भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन याला बोलिव्हियाच्या ह्य़ुगो डेलियन याने १-६, ३-६, १-६ असे हरवले. महिलांमध्ये, स्पेनच्या गार्बिन मुगुरुझा हिने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड हिचा ५-७, ६-२, ६-२ असा पाडाव केला.