अंतिम लढतीत कॅरोलिन प्लिसकोव्हावर मात ; दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी

यंदाच्या हंगामात भन्नाट सूर गवसलेल्या अँजेलिक कर्बरने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरोलिन प्लिसकोव्हाला नमवत जेतेपदावर नाव कोरले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पक्के झालेल्या कर्बरचे कारकीर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही कर्बरने जेतेपदाची कमाई केली होती. अंतिम लढतीत तिने प्लिसकोव्हावर ६-३, ४-६, ६-४ असा विजय मिळवला.

बेसलाइनवरून जोरकस फटके लगावणाऱ्या कर्बरने दडपणाखाली खेळणाऱ्या प्लिसकोव्हाच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये खणखणीत सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध प्लिसकोव्हाने कर्बरला निरुत्तर केले. भेदक फोरहँड, स्लाइस आणि ड्रॉप या फटक्यांचा खुबीने उपयोग करत प्लिसकोव्हाने बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये प्लिसकोव्हाने ३-१ अशी आघाडी घेतली. मात्र सर्वागीण वावर आणि भक्कम बचावतंत्र असणाऱ्या कर्बरने ३-३ अशी बरोबरी केली. ४-४ अशा बरोबरीनंतर मात्र कर्बरने जिद्दीने खेळ करत बाजी मारली.

यंदाच्या वर्षांत ४४७ बिनतोड सव्‍‌र्हिसेसचा विक्रम नावावर असणाऱ्या प्लिसकोव्हाचा सलग बारावा विजय मिळवण्याची संधी हुकली. गेल्या महिन्यात सिनसिनाटी स्पर्धेत प्लिसकोव्हाने कर्बरला नमवले होते.

चुरशीची लढत झाली. मी विजय मिळवू शकले नाही मात्र गेले तीन आठवडे ज्या पद्धतीने खेळते आहे ते समाधानकारक आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत अव्वल खेळाडूंना टक्कर देऊ शकते हा विश्वास मिळाला आहे. अँजेलिकने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाला साजेसा खेळ केला. तिच्याविरुद्ध खेळायला मिळाले हा सन्मान आहे.

– कॅरोलिन प्लिसकोव्हा

एकाच वर्षांत दोन ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावण्याचा अनुभव अनोखा आहे. पाच वर्षांपूर्वी अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत वाटचाल केली होती. तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली. आता या स्पर्धेचे जेतेपद माझ्याकडे आहे. ही भावना सुखावणारी आहे. सगळी स्वप्ने पूर्ण झाली. हा क्षण पुरेपूर अनुभवणार आहे.

– अँजेलिक कर्बर