भारतीय फलंदाजांनी साडेतीनशेपेक्षा धावांचा डोंगर उभारला. हे लक्ष्य आव्हानात्मक होते, मात्र आम्ही किमान लढत देऊ शकलो असतो. मात्र फलंदाजांनी शरणागती पत्करली. आम्ही सकारात्मक पद्धतीने फलंदाजी करायला हवी होती,असे मत श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने व्यक्त केले.
तो पुढे म्हणाला, ‘‘साडेतीनशे धावांचा पाठलाग करताना पहिली दहा षटके महत्त्वाची असतात. आम्ही तिथेच सामना गमावला. खेळपट्टी चांगली होती. भारतात भारताला नमवणे खूपच कठीण आहे. त्यांची फलंदाजांची फळी मजबूत आहे आणि गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. खेळपट्टी निर्जीव असल्याने गोलंदाजांसाठी भारत हे आदर्श ठिकाण नाही. आमचे गोलंदाज अनुनभवी आहेत आणि या अनुभवातून ते खूप काही शिकतील.’’