इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) १४वे पर्व सहा शहरांपुरते मर्यादित ठेवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाविरोधात राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्स या संघांनी अधिकृतपणे आवाज उठवला आहे.

‘बीसीसीआय’च्या सध्याच्या योजनेनुसार, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूरु, कोलकाता आणि अहमदाबाद येथे ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र आपल्या शहरांना वगळल्यामुळे राजस्थान, सनरायजर्स आणि पंजाब या संघांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘‘स्पर्धेची ठिकाणे निश्चित झाल्याबाबतची माहिती आम्हाला अद्यापही ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीने दिलेली नाही. मात्र आमच्या शहरात सामन्यांचे आयोजन न झाल्यास, चाहत्यांसाठी तो एक मोठा धक्का असेल,’’ असे एका फ्रँचायझीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब या तिन्ही फ्रँचायझींनी याविषयी ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमिन यांच्याकडे तक्रार केली असून ते लेखी निषेध नोंदवण्याच्या तयारीत आहेत.

सुरुवातीच्या सामन्यांसाठी प्रेक्षक नकोच -वाडिया

‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ नये. तसेच आयोजनातून मोहालीला का वगळण्यात आले, हे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट करावे, असे पंजाब किंग्सचे सहमालक नेस वाडिया यांनी म्हटले आहे. ‘‘शहरांची निवड करण्यासाठी कोणते निकष आहेत, हे आम्हालाही समजले पाहिजे. पंजाबमध्ये सामने व्हावेत, यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे वाडिया म्हणाले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

‘आयपीएल’ सामन्यांच्या आयोजनातून मोहाली वगळण्यात आल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र ‘बीसीसीआय’ने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. ‘‘करोनाच्या काळातही खेळाडूंचे आरोग्य सुरक्षित राखण्याला आमचे प्राधान्य राहील. त्यासाठी सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. त्यामुळे मोहालीत सामने का आयोजित होऊ शकत नाहीत, हेच मला कळत नाहीत,’’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.