ब्राझील देशामध्ये फुटबॉलविषयी असणारं प्रेम सर्वश्रुत आहे. आतापर्यंत अनेक ब्राझिलीयन खेळाडूंनी जागतिक फुटबॉलच्या विश्वावर आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. आपल्या संघाला पाठींबा देण्यासाठी ब्राझिलीयन चाहते वेळात वेळ काढून मोठ्या संख्येने मैदानात हजर असतात. मात्र एखाद्या प्रसंगी आपला संघ सामन्यात पराभूत झाला तर खेळाडूंना आपल्या चाहत्यांच्या रोषाचाही सामना करावा लागतो. ब्राझीलच्या स्थानिक पोर्तुगिजा फुटबॉल क्लबच्या खेळाडूंना आपल्या चाहत्यांच्या रोषाचा अशाचप्रकारे सामना करावा लागला.

स्थानिक फुटबॉल सामन्यामध्ये साओ पावलो क्लबने पोर्तुगिजा संघाला ३-० असं हरवलं. या पराभवामुळे नाराज झालेल्या पोर्तुगिजा फुटबॉल क्लबच्या चाहत्यांनी आपल्या संघासाठी आलेले १० पिझ्झा परस्पर पैसे देऊन पळवला. राऊटर्स या वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती दिलेली आहे. पोर्तुगिजा हा ब्राझीलच्या स्थानिक फुटबॉलमध्ये सर्वात महत्वाचा संघ मानला जातो.

सामना संपल्यानंतर पोर्तुगिजा संघाने ऑर्डर केलेला पिझ्झा डिलेव्हरी बॉय चुकीच्या गेटने आत घेऊन आला. यावेळी नाराज चाहत्यांनी डिलेव्हरी बॉयला पिझ्झा आत घेऊन येताना पाहिलं. चाहत्यांपैकी काही जणांनी चौकशी केली असता, पोर्तुगिजा संघासाठी हे पिझ्झे आल्याचं समजलं. यावेळी संघाच्या पराभवाने नाराज झालेल्या चाहत्यांनी पिझ्झा डिलेव्हरी बॉयला पैसे देत सर्व पिझ्झा परस्पर पळवले. आपला संघ पराभूत झाल्याने चाहते काहीशे नाराज झालेले होते, मात्र पिझ्झा खाल्ल्यानंतर ते शांत झाले असं म्हणतं, क्लबच्या मालकांनी प्रकरणावर पडदा टाकला.