पहिल्या आशियाई अजिंक्यपद लंगडी स्पध्रेचे सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार अनिकेत आडारकर आणि महिला संघाची कर्णधार साक्षी पिळणकरने व्यक्त केला. बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या या स्पध्रेसाठी भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी भारतीय लंगडी महासंघाने मुंबईच्या दोन युवा खेळाडूंवर सोपवली आहे. पुण्याचा शुभम गीते आणि उत्तर प्रदेशची ज्योती वर्मा यांच्याकडे अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
‘‘नेपाळमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण लढती आणि भूतान झालेल्या तिरंगी स्पध्रेचा अनुभव उपयुक्त ठरेल. भारतीय संघ मजबूत आहे. मधुरा पेडणेकर, साजल पाटील, अनुष्का प्रभू, तन्वी उपळकर यांच्यावर आमची प्रमुख मदार असेल. आक्रमणावर आमची प्रमुख भिस्त असेल. कोलकातामधील सराव शिबिरात आम्ही सांघिक समतोल साधण्यावर आणि तंदुरुस्तीवर मेहनत घेऊ,’’ असे साक्षीने सांगितले.
खेळ जोपासतानाच अभ्यासाकडेही तितकेच लक्ष देऊन मार्च २०१५च्या शालांत परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवणारी साक्षी रुईया महाविद्यालयात शास्त्र शाखेत अकरावी इयत्तेत शिकत आहे. ‘‘बँकॉकच्या वातावरणाशी जुळवून घेणे, हे प्रमुख आव्हान असेल,’’ असे अनिकेत म्हणाला. अनिकेत रिझवी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत अखेरच्या वर्षांला शिकत आहे. तो म्हणाला, ‘‘नेपाळ आणि भूतान दौऱ्यांवर भारतीय संघाने अपेक्षेनुसार आपला खेळ उंचावला. वैयक्तिक सराव तर पुरेसा झाला आहे.’’