27 November 2020

News Flash

अनिकेत चौधरी चमकला

मुशफकीर रहीम आणि सौम्या सरकार यांच्या अर्धशतकी खेळी

| February 6, 2017 12:09 am

बांगलादेशची २२४ धावांची मजल; मुशफकीर रहीम आणि सौम्या सरकार यांच्या अर्धशतकी खेळी

एकमेव कसोटीसाठी भारतात दाखल झालेल्या बांगलादेशची भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या दोनदिवसीय सराव लढतीत घसरगुंडी उडाली. अनिकेत चौधरीने ४ बळी घेत छाप उमटवली. बांगलादेशने २२४ धावांवर डाव घोषित केला. पहिल्या दिवसअखेर भारतीय ‘अ’ संघाने १ बाद ९१ धावा केल्या.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इम्रूल कायेस आणि तमिम इक्बाल जोडीने २२ धावांची सलामी देत सावध सुरुवात केली. चामा मिलिंदने कायेसला बाद करत ही जोडी फोडली. राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिकेत चौधरीने अनुभवी तमिम इक्बालला बाद केले. त्याने १३ धावा केल्या. सौम्या सरकार आणि मोमिनुल हक जोडीने २८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अनिकेतनेच भरवशाच्या मोमिनुलला तंबूत परतवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने धावा करणाऱ्या मोमिनुलला विशेष प्रभाव टाकता आला नाही. ९ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी करून सौम्या बाद झाला. शाहबाझ नदीमने त्याला बाद केले. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने महमदुल्लाने तंबूत धाडले. त्याला २३ धावा करता आल्या. मुशफकीर रहीम आणि सब्बीर रहमान जोडीने सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. विजय शंकरने सब्बीरला बाद केले. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मुशफकीरला अनिकेतने बाद केले. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी साकारली. गेल्या वर्षी अफलातून गोलंदाजीसह जगभरातल्या फलंदाजांना हैराण करणाऱ्या मेहदी हसन मिराझला अनिकेतने भोपळाही फोडू दिला नाही. लिट्टन दासने नाबाद २३ धावांची खेळी केली. बांगलादेशने ८ बाद २२४ धावांवर डाव घोषित केला. अनिकेतने २६ धावांत ४ बळी घेतले. चामा मिलिंद, विजय शंकर, शाहबाझ नदीम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रियांक पांचाळ आणि अभिनव मुकुंद यांनी ४१ धावांची सलामी दिली. पाच वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अभिनवने ३१ चेंडूंत १६ धावांची खेळी केली. शुभसिस रॉयने त्याला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी प्रियांक आणि मुंबईकर श्रेयस अय्यर यांनी ५० धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा प्रियांक ४० तर श्रेयस २९ धावांवर खेळत आहे. भारतीय ‘अ’ संघ अजूनही १३३ धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक

  • बांगलादेश : ८ बाद २२४ डाव घोषित (मुशफकीर रहीम ५८, सौम्या सरकार ५२; अनिकेत चौधरी ४/२६ विरुद्ध भारतीय ‘अ’ संघ : २१ षटकांत १ बाद ९१ (प्रियांक पांचाळ खेळत आहे ४०, श्रेयस अय्यर खेळत आहे २९)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 12:09 am

Web Title: aniket choudhary priyank panchal put india a in command against bangladesh
Next Stories
1 बांगलादेशला कमी लेखणार नाही – साहा
2 बोल्टच्या भेदकतेमुळे न्यूझीलंडने मालिका जिंकली
3 पेसच्या विक्रमी विजयात खंड!
Just Now!
X