कोणत्याही संघासाठी शिस्त अतिशय महत्त्वाची असते. याच शिस्तिचं महत्त्व आता भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे सांगणार आहे. जर कोणत्याही क्रिकेटरमुळे संघाच्या बसला उशिर होत असेल तर त्या क्रिकेटरला ५० डॉलरचा दंड भरावा लागणार आहे असा फतावा कुंबळेंनी काढला आहे. इतकच नाही तर दर चार दिवसांनी मिटिंग घेतली जाणार असून, संघातल्या प्रत्येक खेळाडूसाठी आपल्या घराचे  दार कायम उघडे असेल असेही नव्या प्रशिक्षकांनी जाहिर केले आहे.
भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडू अधिक आहेत. या संघाला शिस्त लावण्याच्या दृष्टीनं कुंबळेंनी नियमात काही बदल केले आहेत.
कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौ-यासाठी सज्ज झालाय.  फक्त संघातल्या खेळाडूंच्याच नाही तर नव्या प्रशिक्षकांनी भारतीय संघाला मदत करणा-या स्टाफच्या वेळापत्रकातही काही सुधारणा केल्यात. ‘भारतीय संघाच्या खेळाडूंना कोणत्याही बंधनात न अडकवता योग्य ती शिस्त लावावी  हे कुंबळेंचे महत्त्वाचं उद्धिष्ट आहे. कुठे बंधने आणायची आणि कुठे नाही हे कुंबळेंना ठावुक आहे.’ अशी स्तुती देखील भारतीय संघासोबत असलेल्या एकाने केली.
वेस्ट इंडिजच्या दौ-यावर निघण्यापूर्वी बंगरूळूच्या कॅम्पमध्ये काही नव्या कल्पना देखील कुंबळेंनी बोलून दाखवल्या. संघातल्या प्रत्येक खेळांडूमध्ये चांगले समन्वय राहावे यासाठी आधिच्या प्रशिक्षकांनी रावबलेली संकल्पना पुन्हा राबवण्याचा विचार कुंबळे करत आहेत.
तसेच खेळाडूंना मॅचेसच वेळापत्रक हे महिनाभर आधी कळावं अशी सूचना देखील कुंबळेंनी बीसीसीआयला केलीय. लॉजिस्टीक विभागाच्या कारभारामुळे अनेकदा खेळाडूंचे लॉजिस्टीक विभागाशी खटके उडतात त्यामुळे खेळाडूंना महिनाभर आधी वेळापत्रक देण्यात यावे अशी विनंती कुंबळेंनी केलीय.