News Flash

‘आयपीएल’च्या आयोजनाबाबत अनिल कुंबळे आशावादी

विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

संग्रहित छायाचित्र

 

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असली, तरी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन नक्कीच करता येऊ शकते, असा आशावाद भारताचा माजी फिरकीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेने व्यक्त केला.

‘‘निश्चितच यंदाच्या वर्षांत ‘आयपीएल’चे आयोजन होण्याबाबत मी अद्यापही आशावादी आहे. विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे न झाल्यास विश्वचषकापूर्वीच्या काळातील मालिकांऐवजी ‘आयपीएल’आयोजन खेळवावी,’’ असे कुंबळे म्हणाला.

‘‘आयपीएल झाल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. मात्र घरबसल्या चाहते नक्कीच सामने बघतील आणि त्याद्वारे आर्थिक नुकसानाची भरपाई करता येणे शक्य आहे,’’ असेही कुंबळेने सांगितले.

महाराष्ट्रात ‘आयपीएल’ शक्य -लक्ष्मण

भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणही ‘आयपीएल’च्या आयोजनाबाबत आशावादी असून त्याने एकाच राज्यातील तीन-चार स्टेडियम्सवर ‘आयपीएल’च्या लढती खेळवण्याचे सुचवले आहे. ‘‘सध्याचे चित्र पाहता, ‘आयपीएल’चे आयोजन अद्यापही होऊ शकते, असे मला वाटते. परंतु ‘बीसीसीआय’ने अशा राज्यात सामन्यांचे आयोजन करावे, जेथे ३-४ स्टेडियम्स उपलब्ध असतील. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न भेडसावेल, मात्र चाहत्यांच्या तसेच सामने रंगतदार करण्याच्या दृष्टीने किमान वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर लढती खेळवता येतील,’’ असे लक्ष्मण म्हणाला. लक्ष्मणने सुचवल्यानुसार वानखेडे, बेब्रॉर्न, डी. वाय. पाटील आणि गहुंजे यांसारखे स्टेडियम महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ‘बीसीसीआय’ महाराष्ट्राला ‘आयपीएल’च्या आयोजनाची संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 3:02 am

Web Title: anil kumble is optimistic about the organization of ipl abn 97
Next Stories
1 युवा क्रिकेटपटूंना मानसिक सामर्थ्यांचे धडे द्यावे -द्रविड
2 इंग्लिश प्रीमियर लीग क्लबचे चौघे करोनाबाधित
3 टी-२० विश्वचषकाचा निर्णय १० जूनपर्यंत लांबणीवर, आयसीसीची बैठक स्थगित
Just Now!
X