भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने तब्बल चार महिन्यानंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. जूनमध्ये अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद होते. त्यावेळी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची वर्णी लागावी, यासाठी विराट खूपच आग्रही होता. यावरून बराच वादंग माजला होता.

बंगळुरुमधील साहित्य महोत्सवात द्रविडने अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. क्रिकेटच्या मैदानात एक काळ गाजवलेल्या कुंबळेंच्या प्रशिक्षकपदाचा एका वर्षाचा काळ यशस्वी होता. पण त्याचा शेवट वाईट झाला. विराट आणि कुंबळे यांच्यात रंगलेला वाद दुर्दैवी होता. पडद्यामागे नक्की काय घडले, याची मला कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. पण कुंबळेसोबत जे झाले ते दुर्देवी होते, कुंबळे यांनी भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्यासोबत असे व्हायला नको होते, असे द्रविडने म्हटले.

चॅम्पियन करंडक स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांनी भारतीय प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. कोहली आणि कुंबळे यांच्यातील मतभेदामुळे कुंबळेंनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली. कुंबळे यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. विराट कोहली हट्टाला पेटल्यामुळेच रवी शास्त्रींना भारतीय संघाचे प्रशिक्षक करण्यात आले, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. या कार्यक्रमात द्रविडने विराटच्या आक्रमक स्वभावाविषयी भाष्य केले. विराट हा खूपच आक्रमक खेळाडू आहे. कोणत्याही मालिकेत मैदानात उतरण्यापूर्वी त्याने केलेली वक्तव्ये थक्क करणारी असतात. त्याच्या स्वभावाने त्याने यश ही मिळत असल्याचे सिद्ध केलंय. पण हातावर टॅटू नसणारे आणि संयमी खेळाडुंमध्येही सामना जिंकण्याची क्षमता असते, असे सांगत द्रविडने अजिंक्य रहाणेचेही कौतुक केले.