क्रिकेटमध्ये रोज नवनवी उपकरणे येत आहेत. कालच BCCIने फिल्डिंग आणि झेल पकडण्याचा सराव करण्यासाठी नवे उपकरण वापरल्याचा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यातच आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी POWER BAT खेळात आणली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ओव्हल मैदानातील सामन्यात या बॅटचा वापर करण्यात आला. या बॅटच्या मदतीने क्रिकेटप्रमींना आपण बॅटने खेळलेल्या प्रत्येकी फटक्याची रिअल टाइम माहिती मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि अनिल कुंबळे यांच्या ‘स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजीस’ या टेक्नॉलॉजी स्टार्टअपने ब्रॉडकॉस्ट भागीदार स्टार इंडियाच्या पाठिंब्याने ही बॅट आणली आहे. गुरुवारी या पॉवर बॅटची घोषणा करण्यात आली.

काय आहे ही POWER BAT

ही बॅट कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT)वर आधारित आहे. यात बॅटला एक हलके, मायक्रोसॉफ्टच्या अझुरे स्‍फेअरचलित स्टीकर बॅटच्या वरच्या बाजूला लावले जाते. यामुळे खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. लाइव्ह सामन्यात फलंदाजाने चेंडूला फटका मारताक्षणी वेग, मर्यादा, परिणाम, बॅटच्या फिरतीचा परिणाम, शॉटचा दर्जा, बॅटवर ज्या ठिकाणी चेंडू लागला त्या आधारे स्क्रीनवर दिसतो.

ही नोंद ‘पॉवर स्पेक’ या नव्या मोजमाप एककात नोंदवली जाईल. ही माहिती सुरक्षितरित्या साठवली जात आहे आणि त्यावर योग्य प्रक्रिया होते आहे, याची खातरजमा मायक्रोसॉफ्टच्या अझुरे स्फेअरकडून केली जाईल. अझुरेवरील आधुनिक विश्लेषण आणि एआय सेवांचा वापर करून स्टम्प बॉक्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष माहिती गोळा केली जाईल आणि प्रसारकाच्या माध्यमातून ती झळकवली जाईल. सराव किंवा प्रशिक्षणाच्या काळातही मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही माहिती पाहता येणार आहे.

सध्या AI आणि IOTमुळे इतर उपकरणांचा कसा वापर होतो, याचा अनुभव कंपनीने चाचणी स्वरूपात घेतला आहे. यानंतर आता क्रिकेट क्षेत्रातही याचा वापर करून या खेळाचा अनुभव अधिक प्रभावी कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी उपाध्यक्ष पेगी जॉनसन यांनी सांगितले.

प्रत्यक्ष खेळाच्या विश्लेषणासह विविध माध्यमातून प्रेक्षकांचा सहभाग वाढवून त्यांना खेळाच्या अधिक उत्तम अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे माजी क्रिकेटपटू आणि ‘स्पेक्टाकॉम’चे संस्थापक अनिल कुंबळे यांनी सांगितले. हे तयार करत असताना यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान सहज, उत्कृष्ट असेल आणि त्यामुळे खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा अडथळा जाणवणार नाही याचा विशेष प्रयत्न केला आहे असेही ते म्हणाले.