मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘प्लेइंग इट माय वे’ या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर टीकेची तोफ डागली. २००७च्या विश्वचषकाआधी जेव्हा चॅपेल यांनी माझ्यासमोर कर्णधारपदाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आपण दोघे भारतीय क्रिकेटवर राज्य करू असे म्हटले होते, तेव्हा माझी पत्नी अंजली तिथे उपस्थित होती, असे सचिनने सांगितले.
‘‘अंजली माझ्यासोबत होती, त्यामुळे मला आणखी काही बोलायची आवश्यकता आहे का,’’ असा प्रश्न सचिनने यावेळी उपस्थित केला. बुधवारी मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात सचिन आणि बोरिया मुझुमदार लिखित आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळी मुलगी साराला त्याने व्यासपीठावर बोलवून घेतले आणि प्रकाशनानंतरची पहिली प्रत गुरुदक्षिण म्हणून त्यांनी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना दिली. प्रकाशनापूर्वी या पुस्तकाची प्रत सचिनने आपल्या आईला भेट दिली.
सचिनने आपल्या आत्मचरित्रात चॅपेल यांना ‘रिंगमास्टर’ संबोधले आहे. सचिनसमोर आपण अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव ठेवला नव्हता, असे स्पष्टीकरण चॅपेल यांनी केले होते. परंतु व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, झहीर खान आणि हरभजन सिंग यांनी सचिनची पाठराखण केली होती.
याबाबत सचिन पुढे म्हणाला, ‘‘मी प्रस्ताव स्वीकार नाही. त्यामुळे मला वाटले ही लढाई संपली. मला संघातील वातावरण खराब करायचे नव्हते. त्यामुळे द्रविडला हे सर्व सांगायचे मी टाळले.’’
ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालखंडाबाबत सचिन म्हणाला, ‘‘चॅपेल यांच्या काळात ड्रेसिंग रूममधील वातावरण मुळीच चांगले नव्हते. अतिशय नकारात्मकता सर्वत्र होती. २००७च्या विश्वचषकात चॅपेल आमच्यासोबत नसते, तर अधिक चांगली कामगिरी भारतीय संघाची झाली असती.’’
या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात वासू परांजपे, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री यांनी सचिनचा प्रारंभीचा प्रवास उलगडला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या भागीदाऱ्या आणि दौऱ्यावरील आठवणींना उजाळा देण्यात आला. मग तिसऱ्या टप्प्यात पत्नी अंजली आणि भाऊ अजित यांनी मर्मबंधातले काही किस्से सांगितले.
द्रविडसोबतच्या भागीदाऱ्या संस्मरणीय -सचिन
२००४मध्ये मुलतान कसोटी सामन्यात कर्णधार राहुल द्रविडने भारताचा डाव घोषित केल्यामुळे त्याचे सचिनसोबत मतभेद झाले होते, याबाबत विचारले असता दोघेही हसले. द्रविड म्हणाला, ‘‘सचिन आणि मी एकमेकांसोबत १६ वष्रे खेळलो. कधी काही गोष्टींबाबत आमचे एकमत झाले तर काही विषयांवर वेगळे मतही होते. पाकिस्तानी भूमीवर आम्ही त्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. सचिन आणि संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्या कसोटी जिंकल्यावर आनंद होता.’’ याबाबत सचिन पुढे म्हणाला, ‘‘मैदानावर असे घडले, परंतु आम्ही लगेच ते प्रकरण मिटवून टाकले. आमच्यातील अनेक सामना जिंकून देणाऱ्या भागीदाऱ्या संस्मरणीय आहेत. आमच्यामध्ये मैत्री आतासुद्धा अबाधित आहे.
पत्रकार अंजली जेव्हा सचिनच्या घरी आली..
विमानतळावर अंजली मेहता या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने सचिनला पाहिले आणि त्याच्यावर ती भाळली. आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी अंजलीने आपल्या प्रेमकहाणीचा उलगडा केला . ती म्हणाली, ‘‘मी आणि माझी मैत्रीण अपर्णा विमानतळावर आई-वडिलांसाठी गेलो होतो. १७ वर्षीय सचिनबाबत मला माझ्या मैत्रिणीने माहिती दिली. मला क्रिकेटमधले काहीही माहीत नव्हते. मी त्याला ‘सचिन, सचिन’ अशी हाक मारू लागली, तेव्हा सचिनला ओशाळल्यासारखे वाटले. त्याने माझ्याकडे ढुंकूनही बघितले नाही. त्यानंतर मी त्याचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. मी त्याला फोन केला आणि नशिबाने त्याने तो उचलला. त्यावेळी विमानतळावर मी तुला पाहिले अशी आठवण सांगितली, तेव्हा सचिनने ती नारिंगी रंगाच्या टी-शर्टमधील तरुणी तूच का, असा सवाल केला.’’k04
सचिनच्या घरी अंजली सर्वप्रथम पत्रकार म्हणून गेली होती, या आठवणीला यावेळी तिने उजाळा दिला. ‘‘एका मुलीला घर दाखवायला कसे आणायचे? या समस्येमुळे तो चिंतेत होता. अखेर त्याने एक पत्रकार मुलगी मला भेटायला येणार आहे, असे घरी सांगितले. परंतु माझ्या वहिनीने ही पत्रकारच की आणखी कोणी, असा सवाल केला,’’ असं अंजलीने सांगितले.
ती पुढे म्हणाली, ‘‘यावेळी सचिनने दौऱ्यावरून आणलेले चॉकलेट माझ्यासमोर ठेवले. ते एकच उरले असल्यामुळे त्याचे तुकडे करून ते ठेवले.’’
कुटुंबीयांना आपल्या प्रेमप्रकरणाविषयी सांगणे हे वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यापेक्षा सचिनसाठी भयंकर होते. ही आठवण सांगताना सचिन म्हणाला, ‘‘मी न्यूझीलंड दौऱ्याचा आनंद लुटत असताता अंजलीने हे काम केले.’’
अंजली म्हणाली, ‘‘एका मोठय़ा क्रिकेटपटूची पत्नी असणे हे कदाचीत लोकांना झगमगीत वाटत असेल. परंतु ते आव्हानात्मक आहे. जेव्हा पती लवकर बाद होतो, भारत हरतो तेव्हा मला व्यक्तिश: असे मनोमनी वाटायचे की, माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना?’’