महाराष्ट्राचा फलंदाज अंकित बावणेने दडपण झुगारून साकारलेल्या शतकामुळे दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पश्चिम विभागाला पूर्व विभागाविरुद्ध पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी घेतली आहे.
पूर्व विभागाच्या पहिल्या डावातील २७८ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पश्चिम विभागाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा (१०) लवकर बाद झाला. परंतु मधल्या फळीतील फलंदाज बावणेने १९४ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी साकारल्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर पश्चिमेने ९ बाद ३२१ अशी दमदार मजल मारली आहे.
पुजाराकडून पश्चिमेला मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. परंतु वेगवान गोलंदाज बसंत मोहंतीने त्याला तंबूची वाट दाखवली. परंतु बावणेला तोलामोलाची साथ दिली ती ७३ धावा काढणाऱ्या युसूफ पठाणने. त्याने १० चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने आपली खेळी उभारली.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग (पहिला डाव) : २७८
पश्चिम विभाग (पहिला डाव) : ९ बाद ३२१ (अंकित बावणे १०५, युसूफ पठाण ७३; राणा दत्ता ५/६०)