स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी जामिनावर सुटलेला राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण याने गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी निष्पाप असून माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. मला सकारात्मक निर्णयाची आशा असल्याचे अंकितने सांगितले.
‘‘क्रिकेटला मी नेहमीच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटवर माझे अपार प्रेम आहे, ते माझ्या नसानसांत भिनलेले आहे. मला अशी आशा आहे की, न्याय व्यवस्थेकडून मला सकारात्मक निर्णय मिळेल. याचप्रमाणे मी माझ्या कारकीर्दीला आणि क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात करू शकेन,’’ असे अंकित म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘मला जामीन दिल्याबद्दल मी न्याय व्यवस्थेचा आभारी आहे. मी माझ्या वकिलांचेही धन्यवाद मानू इच्छितो कारण त्यांनी माझ्यासाठी फार कष्ट घेतले. त्याचबरोबर माझ्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी मला ठोस पाठिंबा दिला.’’
अंकितने लग्नासाठी जामिनाची मागणी केली होती आणि न्यायालयाने ती मान्य केली होती. त्यामुळे प्रेयसी नेहा सांबरीशी त्याने लग्न केले आणि ६ जूनला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन झाला.