News Flash

अंकिताचा पराक्रम युवा पिढीसाठी प्रेरणादायी!

प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांना विश्वास

(संग्रहित छायाचित्र)

एखाद्या भारतीय महिलेने क्रीडा प्रकारात चमक दाखवल्यावर आपसूकच युवा पिढीतील मुले-मुली त्या खेळाकडे वळतात. त्यामुळेच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत अंकिता रैनाला खेळताना पाहून भविष्यात आणखी खेळाडू टेनिसकडे वळतील, असा विश्वास टेनिसपटू अंकिताचे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांनी व्यक्त केले.

पुण्यात टेनिसचे बारकावे शिकणारी २८ वर्षीय अंकिता ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीतील मुख्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणारी ती पाचवीच महिला टेनिसपटू ठरणार आहे. रोमानियाच्या मिहेला बुझार्नेकूच्या साथीने अंकिता खेळणार असून गुरुवारी ते आपल्या अभियानाला प्रारंभ करतील. त्याशिवाय अंकिता अद्यापही महिला एकेरीच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरू शकते.

‘‘अंकितासारख्या खेळाडूला प्रशिक्षण देण्याची संधी मला लाभल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. वयाच्या १०व्या वर्षांपासून अंकिता माझ्याकडे प्रशिक्षण घेत आहे. तेव्हापासून आजपर्यंत ती त्याच जिद्दीने आणि उत्साहाने मैदानावर उतरत आहे. तिच्यापेक्षाही अधिक कौशल्यवान खेळाडू आपल्याकडे आहेत. परंतु त्यांच्या तुलनेत अंकिताची मेहनत वरच्या दर्जाची आहे. त्यामुळे माझ्या प्रशिक्षणापेक्षा तिच्या मेहनतीचे हे फळ आहे,’’ असे बेंद्रे म्हणाले.

‘‘अंकिताचे ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणे ही बाब भारतीय टेनिसमध्ये नवचैतन्य पसरवू शकते. ज्याप्रमाणे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने आपल्या कामगिरीच्या बळावर भारतातील महिला तसेच मुलींना प्रोत्साहित केले. त्याचप्रमाणे सानिया मिर्झानंतर आता अंकिता देशातील युवा पिढीला टेनिसकडे अथवा त्यांच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा देईल, याची मला खात्री आहे,’’ असेही बेंद्रे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:20 am

Web Title: ankita prowess inspires the younger generation abn 97
Next Stories
1 मुंबई मॅरेथॉन ३० मे रोजी
2 मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार
3 मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा; व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
Just Now!
X