सनसनाटी विजयाची मालिका कायम ठेवीत अंकिता रैना या भारताच्या खेळाडूने एनईसीसी करंडक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिला आता इंग्लंडच्या कॅटी डय़ुन्नी हिच्या आव्हानास सामोरे जावे लागेल. दुहेरीत अ‍ॅना मॉर्गिना (रशिाय) व निना स्टोजानोविक (सर्बिया) यांना विजेतेपद मिळाले.
चौथ्या मानांकित अंकिता हिने रुमानियाच्या क्रिस्तिना अ‍ॅनी हिला ६-१, ३-६, ६-३ असे पराभूत केले. अन्य लढतीत कॅटी हिने जॉर्जियाच्या सोफिया शातापावा या तृतीय मानांकित खेळाडूचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. अंतिम सामना शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
अंकिता हिला क्रिस्तिना हिच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. तिने फोरहँडच्या फटक्यांचा बहारदार खेळ करीत पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये अंकिता हिला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत क्रिस्तिना हिने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. तिने हा सेट घेतल्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. साहजिकच तिसऱ्या सेटविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली. हा सेट सव्‍‌र्हिसब्रेकमुळे अधिक रंगतदार झाला. अंकिता हिने चार वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला तर दोन वेळा तिला सव्‍‌र्हिस गमवावी लागली.