भारतीय महिला टेनिसपटू अंकिता रैनाने रविवारी यंदाच्या वर्षांतील पहिले विजेतेपद मिळवले. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने अग्रमानांकित अरांशा रूसला पराभूत केले.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागलेल्या अंकिताने नेदरलँड्सच्या अरांशाला १ तास व २३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-३, ६-२ अशी सहज धूळ चारली. अंकिताचे हे कारकीर्दीतील आठवे विजेतेपद ठरले. महिलांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत १६८व्या स्थानी असणाऱ्या अंकिताला या विजेतेपदाचा लाभ होण्याची शक्यता असून सोमवारी जाहीर होणाऱ्या नव्या यादीनुसार ती क्रमवारीत आगेकूच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गतवर्षी अंकिताने ग्वालियर व नॉथांबुरी येथील स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या फेड चषकापूर्वी अंकिता आणखी दोन स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.