थेट पुरस्कारांसाठीच्या कडक नियमांमुळे प्रशिक्षकांमध्ये नाराजी

प्रशांत केणी, मुंबई</strong>

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमधील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांच्या संख्येत यंदा कमालीची घट झाली आहे. २०१७-१८च्या एकूण १५ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांपैकी १२ थेट पुरस्कारांचा समावेश होता. त्या तुलनेत यंदा २०१८-१९ मध्ये एकूण पाच क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारांपैकी फक्त एकमेव थेट पुरस्कार आहे. थेट पुरस्कारांचे नियम अधिक कडक केल्याने ही संख्या घटल्यामुळे प्रशिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

२०१७-१८च्या राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठीच्या नियमांमध्ये प्रशिक्षकाची १५ वर्षांची कामगिरी बंधनकारक होती. त्यानुसार नियमाआधारे तीन प्रशिक्षकांना गौरवण्यात आले; पण थेट पुरस्कारांच्या नियमांद्वारे पुरस्कार मिळवण्यासाठीचा मार्ग अधिक सोपा होता. ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, डेव्हिस चषक, जागतिक बुद्धिबळ, बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धामधील खेळाडूंचे प्रावीण्य किंवा सहभाग गृहीत धरला जायचा. तसेच आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये मात्र खेळाडूंचे प्रावीण्य हे प्रशिक्षकासाठी पुरस्कारपात्र ठरवायचे.

पण २०१८-१९च्या पुरस्कारासाठी प्रशिक्षकांचे नियम कठोर करण्यात आले. आटय़ापाटय़ा, कबड्डी, क्रिकेट, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉल, यॉटिंग, नौकानयन, हॉकी, हँडबॉल, वॉटरपोलो, रग्बी, बेसबॉल, सॉफ्टबॉल या सांघिक खेळांकरिता एक पुरस्कार निश्चित करण्यात आला. यासाठी मार्गदर्शकाने वरिष्ठ राष्ट्रीय किंवा त्यावरील स्पर्धामध्ये १५ प्रावीण्यप्राप्त खेळाडू घडवणे आवश्यक आहे. याचप्रमाणे कॅरम, कुस्ती, तिरंदाजी, टेबल टेनिस, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग आदी खेळांसाठी मार्गदर्शकाने वरिष्ठ राष्ट्रीय किंवा त्यावरील स्पर्धामध्ये १२ प्रावीण्यप्राप्त खेळाडू घडवणे आवश्यक आहे. अपंग प्रशिक्षकासाठीच्या एका पुरस्कारासाठी १२ प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा नियम मांडण्यात आला आहे.

याआधीच्या शिवछत्रपती मार्गदर्शक पुरस्कारांमध्ये थेट पुरस्कारासाठी खेळाडू पात्र ठरल्यास प्रशिक्षकही सहज पात्र ठरायचा. मात्र नव्या नियमांनुसार मार्गदर्शकांना प्रावीण्यप्राप्त खेळाडू घडवण्याच्या अटीची पूर्तता करणे अवघड असल्याचे मत प्रशिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘‘प्रशिक्षकाच्या थेट पुरस्कारांसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धानंतर रोख रकमेच्या पुरस्कारांसाठी अर्ज करणारे अनेक प्रशिक्षक खेळाडूंकडून चुकीचे दिले जात असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे हे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंचे नातलग किंवा निर्देशित व्यक्ती सहज लाभार्थी व्हायचे. त्यामुळे आधी एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या बळावर थेट पुरस्कार मिळवणे शक्य होते. पण नव्या नियमामुळे हा व्यक्ती प्रशिक्षकच असल्याचे सिद्ध होते,’’ अशी प्रतिक्रिया या पुरस्कार प्रक्रियेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.

प्रशिक्षक हा खेळाडूंच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा घटक असतो. त्याला सन्मानित करताना पडताळणी करण्याची आवश्यकता आहे. मग एक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवून प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळवणे हे अयोग्यच होते; पण नव्या नियमानुसार वैयक्तिक क्रीडा प्रकारांसाठी १२ खेळाडू आणि सांघिक क्रीडा प्रकारांसाठी १५ खेळाडू घडवल्याचा पात्रतेचा निकष हा काही खेळांसाठी अत्यंत अवघड आहे. त्यामुळे इथे ‘कलाकारी’ होण्याचा धोका आहे. याऐवजी एखाद्या खेळाडूच्या जितक्या वर्षांच्या राष्ट्रीय स्पर्धा, त्यानुसार ते गुण समाविष्ट असावे. असे काही नियमसुद्धा बदलणे गरजेचे आहे.

– अ‍ॅड. अरुण देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक

वर्ष           गुणांआधारे      थेट      एकूण

२०१४-१५       २               १३          १५

२०१५-१६       २                ३            ५

२०१६-१७       १                ११         १२

२०१७-१८       ३               १२          १५

२०१८-१९       ४                १            ५