विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रमाणे अतिकठीण परिस्थिती उद्भवल्यास सरस एकूण सीमापार फटक्यांच्या संख्येऐवजी आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात यावी, अशी सूचना मंगळवारी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केली आहे.

लॉर्ड्सवर रविवारी झालेला अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येसुद्धा टाय झाल्यानंतर दोन्ही संघांच्या सीमापार फटक्यांद्वारे विजेता निश्चित करण्यात आला. यात न्यूझीलंडपेक्षा (१६ चौकार) इंग्लंडने (२४ चौकार) अधिक वेळा चेंडू सीमापार धाडल्यामुळे ते विश्वविजेते ठरले.

‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच नव्हे, तर कोणत्याही स्पर्धेत सुपर ओव्हर टाय झाल्यावर  आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात यावी,’’ असे सचिनने सांगितले.